महाराष्ट्र शासनाच्या वतीने निसर्ग संरक्षण व संवर्धनाकरिता माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभियानांतर्गत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याव्दारे निसर्गातील पृथ्वी, वायु, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वांची माहिती व महत्व अधोरेखीत केले जात असून या तत्वांच्या संवर्धानाकरिता जागरुकता निर्माण केली जात आहे.
अभिनव पध्दतीने सजविण्यात आलेल्या या प्रचाररथामध्ये ओवा, तुळशी, कोरफड, कडीपत्ता, अडूळसा, वेलची, गवती चहा अशाप्रकारच्या औषधी वनस्पती व देशी फळझाडे या वृक्षरोपांच्या प्रदर्शनीय कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या प्रचाररथाला भेटी देणा-या नागरिकांना त्यांची माहिती मिळू शकेल. त्याचप्रमाणे या प्रचाररथामध्ये पाला पाचोळ्यासाऱखा ओल्या कच-यापासून खत निर्मिती करावयाची पध्दती त्याचप्रमाणे गांडूळखत बनविण्याची पध्दती या विषयी माहिती मिळण्यासाठी त्याचे पिट्स तयार करण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे या प्रचाररथावर पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे जनजागृतीपर संदेश लावण्यात आलेले आहेत. हा प्रचाररथ बेलापूर पासून दिघ्यापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी उभा राहून सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 4 ते 8 या कालावधीत पर्यावरणाची महती प्रसारित करणार आहे.
एन.एम.टी.च्या वापरात नसलेल्या बसचे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी विद्यार्थी व नामांकित कलावंत श्री. अमोल ठाकूरदास यांच्या कल्पकतेतून अतिशय आकर्षक रुपांतरण करण्यात आले असून यामधूनही टाकाऊतून टिकाऊव्दारे पर्यावरण संदेश प्रसारित करण्यात आला आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या परिसरात हा प्रचाररथ आल्यानंतर त्याठिकाणी भेट देऊन निसर्गातील पंचतत्वांची नव्याने ओळख करून घ्यावी व पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी आपले अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केलेले आहे.
प्रेस नोट
0 टिप्पण्या