Ticker

6/recent/ticker-posts

गुन्हे शाखा युनिट ७ ची दमदार कारवाई

मुंबई पोलीस व 'एफडीए'ची संयुक्त कारवाईला यश


रेमडिसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट पोलीस व एफडीए कडून उध्वस्त 

मुंबई, दादासाहेब येंधे : कोविड १९ या जागतिक महामारीस कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या उपचारांमध्ये परीणामकारक ठरलेल्या रेमडिसिविर इंजेक्शनची उपलब्धता व मागणी यातील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या अन्न व औषध प्रशासनास मिळाल्या होत्या. अन्न व औषध प्रशासनाचा दक्षता विभाग सदर काळाबाजार करणारे यांच्या मागावर होता. सदर प्रकारात गुंतलेल्या एका व्यक्तिचा मोबाइल क्रमांक  सुनील भारद्वाज, सह आयुक्त‌ दक्षता यांना प्राप्त झाला होता. Remdesivir Injection चा काळाबाजार करून अवैधपणे विक्री करणारी मोठी टोळी मुंबई व आसपासच्या परिसरात सक्रिय असल्याच्या शक्यतेवरून  सुनील भारद्वाज, सह आयुक्त‌ दक्षता यांच्या नियंत्रणा खाली गोपनीय कारवाई रचण्यात आली. सदर मोबाईल क्रमांकावर  औषधांची मागणी केली असता या औषधाची प्रत्येक व्हायल किंमत रुपये तीस हजार अशा दराने विक्री करण्याचे मान्य केले. या औषधाची छापील किंमत पाच हजार चारशे असे असताना त्यांनी ३०,००० किंमत असल्याचे आढळले.

 अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी दिनांक १८ जुलै २०२० रोजी बाल राजेश्वर मंदिर, एलबीएस रोड, मुलुंड पश्चिम येथे बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला व विकास दुबे व राहुल गाडा हे एक रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन विक्री कण्यासाठी आले असता त्यांना या औषधाची विक्री करतांना रंगेहात पकडले. पुढील तपासात COVIFOR (Remdesivir Injection) या औषधाच्या सहा व्हायलचा साठा राहुल गाडा यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत या औषधाच्या काळाबाजार करून विक्रीच्या साखळी मध्ये भावेश शहा, अशिष कनोजिया, रितेश ठोंबरे,  गुरविंदर सिंग व सुधीर पुजारी (डेलफा फार्मासिटिकल, घाटकोपर, मुंबई) हे सामील असल्याचे आढळले. या सर्व व्यक्तिंकडे चौकशी करून दोन ठिकाणाहून १२ व सापळ्या दरम्यान एक अश्या एकूण १३ Remdesivir Injections चा अवैधपणे बाळगलेला साठा जप्त करण्यात आला. या सर्व व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले  सर्व व्यक्ती औषधे दुकानदाराकडे सेल्समन  अथवा औषधी कंपनीचे विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत असल्याचे आढळून आले. सदर औषध विक्री करते रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णांचे ओळखपत्र याची मागणी विक्री करते वेळी केली नाही. 

प्रकरणाचे गांभिर्य व व्याप्ती बघता गुन्हे प्रकटीकरण युनिट क्रमांक सात घाटकोपर पोलीस यांचे सहाय्य घेण्यात आले. सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण युनिट क्रमांक -७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांनी सहायक निरीक्षक महेंद्र दोरकर, आनंद बागडे, उपनिरीक्षक संजय सुर्वे तसेच वाडते यांचे पथक तसेच अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी केली.
याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यांमध्ये श्री नांदेकर औषध निरीक्षक यांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे १९४० व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे, मंत्री अन्न व औषध प्रशासन,  माननीय श्री राजेंद्र यड्रावकर, राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन यांनी अशा औषधांचा काळाबाजार व वाजवी किमतीत विक्रीवर यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना च्या अनुषंगाने श्री अरुण उन्हाळे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन,  श्री सुनील भारद्वाज सहआयुक्त दक्षता, श्री. गहाणे सह आयुक्त बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासनाच्या दक्षता विभाग, बृहन्मुंबई विभाग व गुन्हे शाखा घाटकोपर युनिट क्रमांक ७ यांनी संयुक्तपणे केली.
सदर कारवाईवेळी श्री. सुनील भारद्वाज सह आयुक्त दक्षता यांनी स्वतः हजर राहून योग्य ते मार्गदर्शन केले. सदर कारवाईत सहाय्यक आयुक्त श्री झाडबुके, सहाय्यक आयुक्त डॉ. तिरपुडे, औषध निरीक्षक श्री नांदेकर, औषध निरीक्षक गुप्तवार्ता श्री कोंडीबा गादेवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. तावडे व त्यांच्या कर्मचार्‍यांनी भाग घेतला.
रुग्णास औषधे छापील दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास व औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ / ०२२- २६५९२३६२ या वर संपर्क साधावा असे आवाहन सह आयुक्त दक्षता श्री. सुनील भारद्वाज यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या