कोरोना काळात मुंबई बेस्टचे बेस्ट काम
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना लढ्यात सहभागी झालेल्या अत्यावश्यक विभागातील कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रम अविरत सेवा देत आहे. परिवहन आणि विद्युत या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांनी मुंबईकरांच्या सेवेत कुठलीही कसर पडू दिली नाही.
सध्याच्या घडीला सुमारे दहा लाख मुंबईकरांची वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समोर अनेक अडचणी आहेत. कामावर न आलेल्या कर्मचाऱ्यांवर होत असलेली बडतर्फीची कारवाई, कर्मचाऱ्यांना होणारी कोरोनाची लागण तरीही प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष आणि अपुऱ्या सुविधा मिळत असतानाही वाढत्या प्रवासी संख्येवरून मुंबईकरांसाठी बेस्टची सेवाच बेस्ट असल्याचे रोज स्पष्ट होत आहे.
मुंबईकरांची पहिली लाईफलाइन उपनगरी रेल्वे तर दुसऱ्या क्रमांकाची सेवा ही बेस्ट उपक्रम आहे. बेस्टची उत्तम सेवा मिळावी याकरिता महापालिका वारंवार मदतीचा हात देत असते. त्याचबरोबर प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बेस्ट साध्या बसकरिता पाच रुपये आणि एसी बससाठी सहा रुपये तिकीट आकारत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली आणि उपक्रमाला चांगले दिवस येतील असे चित्र होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोना मुळे ब्रेक लागण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी सेवा बंद झाली फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करू लागले. मुंबई, वसई, विरार, पनवेल, भाईंदर, डोंबिवली भागात बेस्ट सेवा देत आहे.
सुरुवातीपासूनच बेस्ट ही अत्यावश्यक सेवेसाठी महत्त्वाची सेवा बजावू लागली. सोशल डिस्टन्सचे नियम पाळून चालक-वाहक अभियांत्रिकी विभाग आणि विद्युत विभागातील कर्मचारी योग्य सेवा देत आहे ही एक अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल.
0 टिप्पण्या