राज्यभर दूध टॅंकर फोडले
पुणे: दूध दरासह दुग्धोत्पादन धोरणात तातडीने सुधारणा व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केले. या आंदोलनात पुणे, कोल्हापूर, नाशिकमध्ये हिंसक वळण लागून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात आले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतले, कॅन रस्त्यावर फेकले. या आक्रमक आंदोलनाचा दूध संकलनावर परिणाम झाला. गाईच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान तर पावडर प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, दूध पावडरची आयात बंद करावी, दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेने मंगळवारी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले होते. कार्यकर्त्यांनी पहाटे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळचा ट्रक अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतले.
काही ठिकाणी दूध काढून ते लोकांना मोफत वाटण्यात आले. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिस बंदोबस्तात गोकुळचे दुध मुंबईला पाठवण्यात आले.
0 टिप्पण्या