ऑनलाईन शिक्षण द्या; पण अभ्यासाचे ओझं टाळा
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देशभरातील शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना विविध ऑनलाईन माध्यमातून शिक्षण कसे द्यावे या विषयीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्ष वर्गात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला ऑनलाईन शिक्षण हा परिपूर्ण पर्याय नाही. त्यामुळे त्याचा वापर गरजेपुरताच करावा असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण जरुर घ्या, पण त्याने अभ्यासाचा असह्य ताण पडून विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घेण्यावर त्यात भर देण्यात आला आहे.
मंत्रालयाने यासाठी 'प्रज्ञाता' या शीर्षकाची ३८ पानांची एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. त्यात ऑनलाइन शिक्षण कोणाला, कसे, कधी व किती वेळ दिले जावे याचे शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वांच्या दृष्टीने साद्यंत विवेचन करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ही मार्गदर्शिका तयार केली आहे. त्या केवळ सूचना आहेत. प्रत्येक राज्य स्थानिक परिस्थिती, साधनांची उपलब्धता व गरज यानुसार त्यात सोयीनुसार फेरबदल करू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणाला किती वेळ शिकवावे?
पूर्व प्राथमिक : बालवाडी छोटा शिशु मोठा शिशु वर्गातील मुलांना अजिबात नाही. फार तर आठवड्यातून एक दिवस ठरवून पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याशी तीस मिनिटे संवाद.
इयत्ता पहिली ते आठवी : आठवड्यातून किती दिवस ऑनलाईन वर्ग
राज्य सरकारांनी ठरवावे. परंतु त्या ठरलेल्या दिवशी प्रत्येकी ३० ते ४५ मिनिटांचे जास्तीत जास्त दोन वर्ग असावेत.
इयत्ता ९ वी ते १२ : राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दिवशी प्रत्येकी ३० ते ४५ मिनिटांचे चार वर्ग.
0 टिप्पण्या