थर्टी फर्स्ट यंदा घरी साजरा करा
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत थर्टी फर्स्ट तसेच नवीन वर्षाचे स्वागत दरवर्षी मोठ्या जल्लोषात केले जाते. चौपाट्या भरलेल्या असतात, हॉटेल ओसंडून वाहत असतात. मात्र, यंदाच्या थर्टी फर्स्टला कोरोनाचे गालबोट लागलेले आहे. मुंबईसह राज्यात कोरोमचं रोगाचा प्रभाव कायम असल्यामुळे यंदा थर्टी फर्स्ट घरीच आणि साधेपणाने साजरी करा, असे आवाहन सरकारने केले आहे. गृह विभागाने सोमवारी राज्यातील नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढू नयेत असे यात स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने राज्य महापालिका हद्दीत २२ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच दोन्ही विभागांच्या सूचनांप्रमाणे ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी व १० वर्षांखालील मुलांना आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर पडणे टाळावे. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिक मोठया प्रमाणात धार्मिक स्थळांत जात असतात. त्या ठिकाणी गर्दी न करता सुरक्षित वावराच्या निकषांचे पालन करावे. तसेच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.


0 टिप्पण्या